गेल्या अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणाचा प्रश्न चर्चेत आहे. त्यामुळे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील हे वारंवार आक्रमक होताना दिसत आहेत. मात्र आता विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे. अशातच आता उमेदवारी अर्ज भरण्याचा देखील सुरवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे आणि संभाजी ब्रिगेडमध्ये काय ठरलं? याची माहिती माजी मंत्री बदामराव पंडित यांनी दिली आहे.
मनोज जरांगे पाटलांनी घेतली महत्वाची भूमिका
विधानसभा निवडणुकीच्या तारखा झाल्यापासून अंतरवली सराटीला अनेक दिग्गज नेते मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करण्यासाठी येत आहेत. अशातच आता संभाजी ब्रिगेडच्या नेत्यांनी देखील मनोज जरांगे यांची भेट घेतली आहे. मात्र या बैठकीत काय घडलं? यासंदर्भातील माहिती माजी मंत्री बदामराव पंडित यांनी दिली आहे.
बदामराव पंडित म्हणाले की, संभाजी ब्रिगेड हे एक संघटन आणि राजकीय पक्ष आहे. त्यामुळे मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश व्हावा तसेच ओबीसी आरक्षणाचे संरक्षण व्हावे हे मुद्दे घेऊन संभाजी ब्रिगेड बऱ्याच वर्षापासून काम करत आहे. मात्र आता तीच भूमिका मनोज जरांगे पाटलांनी देखील घेतल्याची माहिती बदामराव पंडित यांनी दिली आहे.
आपला झेंडा, आपला अजेंडा
याशिवाय विधानसभेत आपली माणसं पाठवायची असल्यास आणि आपले प्रश्न देखील मार्गी लावायचे असल्यास समविचारी लोकांशी चर्चा करून राजकीय भूमिका घेणे गरजेचे आहे. त्यामुळे आपला झेंडा आणि आपलाच अजेंडा ही भूमिका असली पाहिजे. मात्र याबाबत पुढे निर्णय होईल आणि त्या अनुषंगाने पुढे वाटचाल देखील चालू होईल असं बदामराव पंडित म्हणाले आहेत.