आंदोलनातील महिला निराधारांचा उल्लेख कार्यकर्त्या करुन बदामरावांनी निराधारांचा अवमान केला
गेवराई (प्रतिनिधी) दि. १० – पावसाळ्याची चाहुल लागताच बेडकांची डराव-डराव सुरु होते तशी निवडणुकीची चाहुल लागताच काही नेते बरळु लागतात. भाजपा बरोबर मिले सुर मेरा तुम्हारा म्हणुन काम करणार्या बदामरावांनी निराधारांच्या प्रश्नांवर भाजपची पोपटपंची करु नये, मुळात विषयाची माहिती न घेता कोणीतरी लबाड दलाल बोलतो म्हणुन केवळ प्रसिद्धीच्या मोहापाई काहीतरी खोटेनाटे आरोप करण्याचे काम त्यांनी करु नये असा सल्ला विजयसिंह पंडित यांनी दिला. खर्या निराधारांना शासन अनुदानाचा लाभ देण्याची मागणी आम्ही करत आहोत, मंजुर असलेल्यांचे अर्ज नामंजुर करावेत अशी आमची मागणी नसल्याचे प्रतिपादन विजयसिंह पंडित यांनी केले. प्रसिद्धी पत्रकाव्दारे त्यांनी बदामराव पंडितांच्या टिकेला उत्तर दिले.
मागच्या विधानसभा निवडणुकी पासुन बदामराव पंडित गेवराई भाजपाची बी टीम म्हणुन कार्यरत आहे. स्वत: ते कोणत्या पक्षात आहेत ? याचा थांगपत्ता कोणालाही लागु देत नाहीत. अनेक दिवस राजकीय विजनवासात असतांना अचानक खा. शरदचंद्रजी पवार साहेबांच्या भेटी नंतर ते जागे झाले, त्यावेळी सुद्धा माध्यमासमोर बराळण्याचे काम त्यांनी केले होते. गेवराई तालुक्यात उपेक्षित, वंचित, विधवा, दिव्यांग निराधारांचा गंभीर प्रश्न असतांना त्यांच्या न्याय हक्कासाठी विरोधी पक्ष म्हणुन रस्त्यावर उतरुन लढण्या एैवजी भाजपा आमदाराच्या सुरातसुर मिसळुन त्यांची पोपटपंची करतांना दिसत आहेत. तालुक्यातील निराधारांच्या न्याय हक्कासाठी केलेल्या आंदोलनात अनेक वयोवृद्ध, विधवा निराधार महिला सहभागी झाल्या होत्या. या निराधार महिलांचा बदामराव पंडितांनी कार्यकर्त्या म्हणुन उल्लेख करुन त्यांचा अवमान केला आहे. खर्या अर्थाने बदामरावांनी त्यांची माफी मागितली पाहिजे असे प्रतिपादन बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी केले. बदामराव पंडित यांनी काढलेल्या प्रसिद्धी पत्रकाला उत्तर देतांना ते बोलत होते.
पुढे बोलतांना विजयसिंह पंडित म्हणाले की, अनेक वर्ष आमदार आणि राज्यमंत्री पद उपभोगलेल्या बदामरावांसारख्या माणसाने त्यांच्या सोबत काम करणार्या अनेक कार्यकर्त्यांना निराधार करण्याचे पाप केले. त्यांच्या मुळे कित्येकांचे संसार उद्धवस्त झाले, पाहिजे असेल तर आपण त्यांना ही यादी पुरवू शकतो असा टोला लगावतांना विजयसिंह पंडित म्हणाले की बदामराव पंडितांना निराधारांचे प्रश्नच समजले नाहीत. अलीकडे त्यांचा संपर्क नसल्यामुळे कदाचित असा प्रकार घडु शकतो. मात्र आमचे आंदोलन भाजपा आ. लक्ष्मण पवार यांच्या शिफारशी मुळे गठीत झालेल्या समितीने केलेल्या लाचखोरी विरोधात होते. समितीचा अध्यक्ष दलाल आहे, त्याला आमच्या आंदोलनाची नक्कीच झळ पोहचली असावी. मात्र बदामराव पंडितांनी असंबंधितपणे या प्रश्नावर व्यक्त होणे निव्वळ हास्यास्पद आहे. त्यांच्या सारख्या वयोवृद्धाकडुन निराधारांच्या अनुदानाचा उल्लेख पगार असा करणे निव्वळ आपल्या बालीशबुद्धीचे प्रदर्शन करणारे वाटते असेही त्यांनी सांगितले.
निराधारांच्या प्रश्नावर कायम लढा देत राहु, तालुक्यातील प्रत्येक पात्र निराधारांना शासनाचे रास्त अनुदान मिळाले पाहिजे हीच आमची मागणी आहे. कोणाच्याही ताटातले ओढण्याचे पाप आम्ही करत नसल्याचे शेवटी विजयसिंह पंडित यांनी स्पष्ट केले.